Wednesday, November 8, 2017

महाराष्ट्र भूषण: पु. ल. देशपांडे

अरे नोटबंदी, राजकारण, मोदी-राहुल यातच आपण अडकलो आहोत पण यां महाराष्ट्र भूषणाला विसरुन कसं चालेल?

पुलंनी आपली मराठी भाषा, मराठी रंगभूमी (लेखन, दिग्दर्शन आणि नाट्य अभिनय), चित्रपट *(दिग्दर्शक, लेखक, नायक, संगीत दिग्दर्शक, गायक, संवाद लेखक, कथा, पट कथा लेखक) अभिनय, चतुरस्त विनोदी लेखन, चित्रकारी, उत्तम हार्मोनियम वादनानी समृद्ध केली आणि या ही पेक्षा सगळयांना मदत करणारा एक दिलदार, रसिक माणूस.

नुसते महाराष्ट्र भूषण नाही तर पुलं जेव्हा त्यांचं काम संपवुन दिल्ली  सोडून महाराष्ट्रात परत आले तेव्हा "दिल्लीच्या साहित्य क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघाली नाही" असं प्रत्यक्ष पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते.



आठ नोव्हेंबर हा पुलंनचा वाढदिवस. महाराष्ट्राला भर-भरून हसवणारा, कधी अंतर्मुख करणारा हा अवलिया बारा जून २००० ला महाराष्ट्राला पोरका करून गेला. पण कलेतील अनेक क्षेत्र समृद्ध करून गेला. माझ्यापुरतं बोलायचं, तर मला 'वाचता आणि लिहिता' करणारा हा लेखक माझ्या साठी काय आहे हे माझ्याशिवाय कोणी दुसरे नाही सांगू शकत. नुसतं  'वाचता आणि लिहिता' करणारा नाही तर अनेक माणसं मी पुलंनमुले पाहू शकलो, त्यांच्या त्या लिखाणातून ती माणसं जिवंत झाली मग चितळे मास्तर वाचताना केमकर, केकतपुरे आणि भोळे सर आठवतात तर हरी तात्या वाचताना एका दूरच्या आजोबांची आठवण आल्यावाचून राहत नाही.
माझा काडीचाही संबंध नसताना गणगोत मधील 'म्युझिक डा(यरेक्त्तर) क्टर! केशव राव भोळे' वाचताना ते म्युझिक कंपोझ  करताना दिसू लागले "दोन घडींचा डाव त्याला जीवन ऐसे नाव". कुमार गंधर्वांची गायकी उमगली, पं. वसंत खा देशपांडे नव्याने समजले. माणिक वर्मा अधिक गोड झाल्या, बाकी बाबा पोएट बोरकर यांच्या रूपाने कवितेचं दालन किलकिलं झालं . गाण्यातील शास्त्रीय संगीत अधिक आवडू लागलं.  आधिच  रसिक असलेल्या मनातला रसिक आणखी जागा झाला आणि मग ऑस्ट्रेलियात एका स्टेशन वरील  गिटार वादकाला त्याची अदाकारी आवडली म्हणून मनापासून मिठी मारली. त्यालाही ते जाणवलं पण शेवटल्या दिवशी तो न भेटल्यानी जी हूर हुर जाणवली, ती हे पुलंनी माणसं वाचायला आणि आवडायला शिकवल्या मुळेच.

जावे त्यांच्या देशा पुस्तकात जेव्हां 'मिस्टर सॅन फ्रान्सिस्को' वाचले तेम्हा प्रवास वर्णनातील नवीन पहलु कळले. आजपर्यंत  मी पुलंन इतक जिवंत प्रवास वर्णन वाचलं नाही.
"शहरं  पायी हिंडवी म्हणजे ती अशी घुटक्या घुटक्या ने पिता येतात असं मोटारीत बसून भुर्रकन जातांना शहर बघता येत नाही"
"सॅन फ्रान्सिस्कोतील ट्रामेतून जाताना मला मुंबईतील ट्राम आठवली आणि मुंबईतील ट्राम बंद झाली तेव्हा मला माझी आजी गेल्या इतकं दुःख झाले" -  इति पुल.
मुंबईकरांची भावना किती  नेमक्या, सहज आणि  मोजक्या शब्दात मांडली!


"माणसे एखाद्या शहरात वर्षानुवर्षे राहतात. पण त्यांचा त्या शहराशी स्नेहच जमलेला नसतो. वर्षानुवर्षे पुण्यात राहण्याऱ्या माणसांने बालमखीऱ्यांच्या मोसमात मंडईत जाऊन ती काकड्यांची रास पहिली नसेल तर तो पुण्यात राहीला  काय किंव्हा आणखी कुठे कडमडला काय , - अर्थ एकच! तुमचा देवावर विश्वास असो वा  नसो, - कोल्हापूरला राहण्याऱ्या माणसाने नवरात्राच्या उत्सवात धक्काबुक्की करून अंबाबाईचे दर्शन घेतलेच पाहिजे. तिथे उसळेलेल्या गर्दीची ख़ुशी अंबाबाईच्या मुखमंडळावर दिसते, ती पहिली पाहिजे. आपल्या राहत्या घरासारखा आपल्या राहत्या शहराशी जीव गुंतवला पाहिजे."
शहरावर तर मी प्रेम करतच होतो पण पुलंच्या ह्या ओळी वाचल्या आणि ती भावना आणखी दृढ झाली.
नागपूरचा असल्याने नागपूर  प्रेमी तर आहेच, नागपूरची जागा कोणी घेऊ शकत नाही.  पण पुणे, ठाणे, बॉस्टन आणि डॅलस या शहरांवर पण मी मनापासून प्रेम करतो.
माणसं, मुंबईची गर्दी, लोकल यातही मजा आहे आणि ती घेतली पाहिजे हे पुलंनी समजावले! एका जमान्यात मला अंधेरी स्टेशन च्या गर्दीत कुतूहलयुक्त मजा येई, वाटे रात्री बाराला ट्रॅफिक जॅम आणि स्टेशनवर तोबा गर्दी हीच ती मुंबई रे !

अख्या महाराष्ट्राच्या जीवनाचं गाणं करणाऱ्या ह्या संगीतकाराने मोजक्या पण अजरामर रचना दिल्या
१. माझे जीवन गाणे
२. कबीराचे विणतो शेले
३. तुझ्या मनात कुणीतरी लपलं
४. हसले मनी चांदणे
५. नाच रे मोरा (बाल गीतातील श्रेष्ठतम गीत)

ज्याला हात लावला त्याचं सोनं केलं, १९९१ च्या एक होता विदूषक या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहली होती व याला अनेक राज्य स्थरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

पुलं आणि एकही विनोद नाही असं होईल का?

एकदा नगरला एक चित्रकला आणि तैलचित्र प्रदर्शन आयोजित केलं होतं. आयोजकांनी पुलं आणि एका बंगाली दग्दर्शकाला बोलावलं होतं. उदघाटन सोहोळ्यात कोणीतरी टोमणा मारला की आयोजक ही खूप करतात बोलावलं कोणाला तर पुलं आणि बसू भट्टाचार्याना. पुलं नाटक वाले तर बासू चित्रपट वाले. ह्या पुलंनी कधी हातात ब्रश तरी पकडला असेल का?  यावर पुलं तत्क्षणी म्हणाले "असं कस म्हणता तुम्ही (दाढी ची ऍक्शन घेत) रोज घेतो की हातात"! आणि लगेच त्यांनी कॅनव्हासवर ब्रशनी फटकारे मारून स्वतःची कला दाखवली.

सरते शेवटी काय तर आई, वडील काही शिक्षक आणि पुलं यांच्या कडून हे कुठेतरी मनावर कोरल गेलं.....

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.


-अमोल दाण्डेकर 
* गुळाचा गणपती हा चित्रपट सबकुछ पु. ल. होता
ऋणनिर्देश: Sketch : अभिजित देवघरे

3 comments:

  1. वा अमोल पुलं ना रेखाटताना तू खरा खुरा अमो...ल

    ReplyDelete
  2. Very nicely penned !!!! Great job !!!

    ReplyDelete

महाराष्ट्र भूषण: पु. ल. देशपांडे

अरे नोटबंदी, राजकारण, मोदी-राहुल यातच आपण अडकलो आहोत पण यां महाराष्ट्र भूषणाला विसरुन कसं चालेल? पुलंनी आपली मराठी भाषा, मराठी रंगभूमी (ल...